किटाडी-अड्याळ मार्गावर कारसमोर आला पट्टेदार वाघ!

- १५ ते २० मिनिटे रस्त्यावर ठिय्या; तीन तरुणांची उडाली भंबेरी, चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / लाखनी : तालुक्यातील किटाडी शिवारात मागील अडीच वर्षांपासून वावर असलेल्या पट्टेदार वाघाचे बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पुन्हा दर्शन झाले. किटाडी-अड्याळ राज्य मार्गावरून कारने प्रवास करणाऱ्या तीन तरुणांच्या वाहनासमोरच वाघ आल्याने त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. एवढेच नव्हे, तर वाघ कारच्या दिशेने येऊ लागल्याने तरुणांनी वाहन मागे घेत काही अंतरावर थांबवले. या प्रसंगातही एका तरुणाने मोबाइल कॅमेऱ्यात वाघाचे चित्रीकरण केले. या घटनेची चित्रफीत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अचानक वाघ समोर आल्याने उडाली धांदल -
मिळालेल्या माहितीनुसार, किटाडी येथील दीपक कांबळे, आकाश तरारे आणि टेनिस तरारे हे तिघे बुधवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता चारचाकी वाहनाने किटाडी-अड्याळ राज्य मार्गावरून आपल्या गावाकडे परतत होते. किटाडीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पोहोचताच अचानक एक पट्टेदार वाघ मुख्य रस्त्यावर आला. रस्त्यावर अचानक वाघ दिसल्याने कारमधील तिघेही घाबरले. मात्र, वाघ तिथेच थांबला नाही, तर तो थेट कारच्या दिशेने येऊ लागला. वाघ वाहनाच्या अगदी जवळ पोहोचल्याने तरुणांची भंबेरी उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी कार मागे घेतली आणि काही अंतरावर थांबवली.
१५ ते २० मिनिटे रस्त्यावरच वाघाचा ठिय्या -
पट्टेदार वाघ जवळपास १५ ते २० मिनिटे मुख्य रस्त्यावरच उभा होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाघ रस्त्यावरून बाजूला होण्याची प्रतीक्षा वाहनचालकांना करावी लागली. काही वेळानंतर मानवी हालचालींची चाहूल लागताच वाघाने रस्त्यावरून जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केले. या संपूर्ण प्रसंगादरम्यान तिघांपैकी एका तरुणाने मोबाइल कॅमेऱ्यात वाघाचे चित्रीकरण केले. ही चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर परिसरात वाघाच्या वावराची चर्चा सरू झाली आहे.
अडीच वर्षांपासून किटाडी शिवारात वाघाचा वावर -
किटाडी शिवारात मागील अडीच वर्षांपासून पट्टेदार वाघाचा वावर असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. या परिसरात वाघ वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अनेक नागरिक टाळतात. वाघाचा वारंवार वावर असलेल्या या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
वाहनचालकांना वाघ किंवा अन्य वन्यप्राणी दिसल्यास त्यांनी वाहनातून खाली उतरू नये, वन्यप्राण्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखून संबंधित वनविभागाला माहिती देणे आवश्यक आहे. किटाडी-अड्याळ मार्गावरील या घटनेमुळे परिसरातील वन्यप्राण्यांच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी या भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.




Petrol Price




