सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा : दोषींवर कठोर कारवाई करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद व चिंताजनक आहे. या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे निवासी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थिनीला नवरात्री उत्सवाला जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची बाब समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि घटनेची कारणे अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे अभाविपने नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही संबंधित प्रशासन, शाळा व्यवस्थापन, वसतिगृहाचे अधीक्षक तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांवर असते. त्यामुळे या प्रकरणाची कोणताही पूर्वग्रह न ठेवता सखोल चौकशी करण्यात यावी, घटनेपूर्वीची परिस्थिती तपासण्यात यावी आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी -
अभाविपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थिनीवर घटनेपूर्वी कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण, दबाव किंवा धमकी होती का, याची तपासणी करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच वसतिगृहातील वार्डन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी आपापली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडली होती का, याची पडताळणी करून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, नोंदवह्या आणि अन्य महत्त्वाचे पुरावे सुरक्षित ठेवून त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करावी, यावरही अभाविपने भर दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करा -
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेच्या वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी तातडीने विशेष तपासणी करावी आणि आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मानसिक आधार व समुपदेशन उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या समस्या आणि तक्रारी गोपनीय पद्धतीने मांडता याव्यात, यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, या प्रकरणातील चौकशीची सद्यस्थिती, निष्कर्ष आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत नियमानुसार लेखी माहिती देण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे प्रशासनाची जबाबदारी -
निवासी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित, भयमुक्त आणि विश्वासपूर्ण वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे. या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना गडचिरोली नगरमंत्री संकेत म्हस्के, विकास बोदलकर आणि सौरव ढवळे उपस्थित होते.




Petrol Price




