महत्वाच्या बातम्या

 भगवान बिरसा मुंडा यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम


- बोरी येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : आदिवासी समाजाच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि संघर्षाचे महान प्रतीक असलेले जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आणि कार्य आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी दिलेला लढा नव्या पिढीला सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

कोरची तालुक्यातील बोरी येथे जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदु नरोटे होते.

यावेळी बोलताना आ. आत्राम म्हणाले की, बोरी येथे भगवान बिरसा मुंडा यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आल्याने आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण सदैव जिवंत राहील. आदिवासी समाजाने आपली संस्कृती, परंपरा, भाषा आणि अस्मिता जपण्यासोबतच शिक्षण व विकासाच्या प्रवाहात पुढे यावे. भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक आदिवासी नृत्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरत त्यांनी आदिवासी संस्कृती आणि लोकपरंपरेशी असलेले आपले नाते अधोरेखित केले. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, नानाभाऊ नाकाडे, युनूस शेख, रिंकू पापडकर, लीलाधर भरडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, आदिवासी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

या सोहळ्याच्या निमित्ताने आदिवासी गोंडी नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सामूहिक नृत्य, युगल नृत्य आणि एकल नृत्य अशा विविध प्रकारांत स्पर्धा पार पडली. या माध्यमातून आदिवासी समाजाची पारंपरिक कला, संस्कृती आणि लोकपरंपरेचे दर्शन घडले. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





  Print






Related Photos