अहेरीत गणेश मंडळात आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव अंतर्गत अहेरी शहरातील जुनी तहसील परिसरातील १) संत मानव दयाल गणेश मंडळ आणि २) पाता अहेरी परिसरातील ,जय पेरसापेन गणेश मंडळ येथे नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर आरोग्य शिबिराचे आयोजन ,मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे सर ,मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका उईके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. लूबना हकिम मॅडम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मा .वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यश्री ढोरे मॅडम,मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी आत्राम मॅडम, आरोग्य सहाय्यक निकेश संतोषवार सर, आरोग्य सेवक राशीद शेख, औषध निर्माण अधिकारी खेमराज कोडापे, प्रणय मुळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैष्णवी चिळंगे, अधिपरिचारिका भारती नरोटे, आकांक्षा रामटेके, रामबाई सीडाम तसेच आशा वर्कर यांच्या उपस्थितीत परिसरातील नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य तपासणी उपक्रमामध्ये तिशीचा पल्ला - तपासणी अन् सल्ला तसेच १०० दिवसीय अभियानांतर्गत असंसर्गजन्य आजारांचे (NCD) स्क्रीनिंग करण्यात आले. नागरिकांची रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करून आवश्यकतेनुसार आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच LCDC कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोगाबाबत तपासणी करण्यात आली.
यासोबतच नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली. पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तसेच आभा कार्ड काढण्यात आले. परिसरातील नागरिकांना कीटकजन्य व जलजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. डासांपासून होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाणीचा नियमित वापर, परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी नष्ट करणे याबाबत जनजागृती करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय सर्पदंश दिनानिमित्त नागरिकांना सर्पदंशापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता रुग्णाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात घेऊन जाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पुजारी, मांत्रिक किंवा पारंपरिक उपचार करणाऱ्या व्यक्तीकडे उपचार न करता तात्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
सर्पदंशाच्या घटनांमध्ये वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी सर्पदंशाबाबत गैरसमज व अंधश्रद्धा टाळून शास्त्रीय पद्धतीने उपचार घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. घराच्या अवतीभवती केरकचरा न ठेवणे, लाकडांची सरपण तसेच दगडांचे विटांचे ढीग ठेवू नये.
खिडक्यांना जाड्या बसविण्यात यावे या उपाययोजना बद्दल जनजागृती करण्यात आली. या आरोग्य तपासणी व जनजागृती अभियानाला संत मानव दयाल गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य तपासणीसोबतच विविध शासकीय आरोग्य योजना, आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि सर्पदंशाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.




Petrol Price




