महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी माता-बाळ मृत्यू प्रकरणी दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा : आजाद समाज पक्षाचे निवेदन 


- आजाद समाज पक्षाचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन; तातडीने चौकशी करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : चामोर्शी येथील रुग्णालयात माता-बाळ मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी वैद्यकीय अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने रुग्णावर वेळेवर उपचार होण्यास विलंब झाला. त्यामुळे प्रसूतीदरम्यान निर्माण झालेली परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित रुग्णाची प्रसूतीची वेळ पूर्ण झालेली होती आणि रुग्णाची प्रकृती सुरुवातीला सामान्य असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चामोर्शी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या बाबतीत सीझेरियन शस्त्रक्रियेची वेळ आली की, वैद्यकीय अधिकारी अनेकदा रुग्णांना इतरत्र रेफर करतात, असा आरोप आजाद समाज पक्षाने केला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचा नेमका कितपत वापर केला जातो, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध असतानाही आठवड्यात केवळ एक दिवस सोनोग्राफी केली जाते, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. उर्वरित दिवसांमध्ये रुग्णांना डॉ. देऊरी यांच्या खासगी क्लिनिकमध्ये सोनोग्राफीसाठी बोलावले जाते, असा गंभीर आरोपही पक्षाने केला असून या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची उपस्थिती, उपलब्ध सुविधांचा वापर तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे आजाद समाज पक्षाने म्हटले आहे.

माता-बाळ मृत्यू प्रकरणाची तातडीने व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आजाद समाज पक्षाने केली आहे.





  Print






Related Photos