महत्वाच्या बातम्या

 बल्हारशाह रेल्वे स्थानकावर दोन महिलांकडून अवैध देशी दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्हारशाह रेल्वे स्थानकावर अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना रेल्वे पोलिसांनी रंगेहात पकडले. १२ नोव्हेंबर रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर करण्यात आलेल्या या कारवाईत दोन्ही महिलांकडून रॉकेट संत्रा देशी दारूच्या एकूण १८० प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत ७ हजार २०० रुपये असून, या कारवाईमुळे रेल्वे मार्गाने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी गलोथ भाग्य लक्ष्मी ३७ वर्ष आणि राधाबाई पेन्टू कम्मलवार ५७ वर्ष, दोघीही रा. नौगाम बस्ती, कागजनगर, जिल्हा आदिलाबाद (तेलंगणा) यांच्याकडून दारू जप्त करण्यात आली. भाग्य लक्ष्मी हिच्याकडे ९० मिलीच्या ६० बाटल्या, तर राधाबाई हिच्याकडे १२० बाटल्या आढळून आल्या. दोघींकडे मिळून १८० बाटल्या असल्याचे तपासात समोर आले.

गोपनीय माहितीच्या आधारे रेल्वे स्थानकावर शोधमोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. दोन्ही महिलांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन बल्हारशाह रेल्वे पोलीस चौकीत आणण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व ६६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अप.क्र. ३१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल नगदाळे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मंगेश शिंदे आणि अपर पोलीस अधीक्षक (जीआरपी नागपूर) डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूरचे प्रभारी अधिकारी एपीआय पंकज ढोके आणि रेल्वे पोलीस स्टेशन वर्धाचे प्रभारी अधिकारी पीआय विरसेन चहांदे यांच्या नेतृत्वात पोलीस शिपाई निलेश निकोडे आणि पोलीस शिपाई अखिलेश चौधरी यांनी केले.





  Print






Related Photos