इंजापूरच्या आश्रमशाळांमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील इंजापूर येथील वनिता प्राथमिक आश्रमशाळा आणि स्व. भाऊराव चटप आश्रमशाळेत ६ ऑक्टोबर रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला २०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या आदेशानुसार तसेच परीक्षा अधिकारी आतिश कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महिला व बालकांच्या संरक्षणाशी संबंधित विविध कायदे, हक्क आणि उपलब्ध शासकीय सुविधांची माहिती देण्यात आली.
सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी खडसे यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याची माहिती देताना पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाढत्या वयात मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याविषयीही त्यांनी माहिती दिली.
चाइल्ड हेल्पलाइनच्या सुपरवायझर कल्पना फुलझेले यांनी १०९८ या हेल्पलाइन क्रमांकाची कार्यपद्धती समजावून सांगितली. शून्य ते १८ वर्षे वयोगटातील अडचणीत असलेल्या बालकांना मिळणारी मदत, बाल संगोपन योजना तसेच अनाथ प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्राच्या डाटा एन्ट्री ऑपरेटर पापीहा महाकाळकर यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले. तसेच गुड टच, बॅड टच ची संकल्पना समजावून सांगत स्वसंरक्षणाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक ए. एस. दराडे, अधीक्षक पि. आर. उदार, कार्यवाहक एन. आर. चटप यांच्यासह शिक्षकवृंद आणि २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस. एन. मालेकर यांनी केले, तर व्हि. बी. तोगरे यांनी आभार मानले. या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बालहक्क, महिला व बालकांचे संरक्षण आणि संबंधित कायद्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.




Petrol Price




