ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार : एक गंभीर जखमी


- दिवाळीनिमित्त मूळ गावी जाणाऱ्या डॉ. अरबिंदा सेन यांचा जागीच मृत्यू
- अपघातात नीलेश बावणे गंभीर जखमी; सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू
- उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी केली पाहणी; वाहतुकीचा खोळंबा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : नंदोरी-हिंगणघाट मार्गावरील नंदोरी चौकात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.
डॉ. अरबिंदा सेन ३० वर्ष, मूळ रा. बेराबेरिया, पश्चिम बंगाल, सध्या रा. डोंगरगाव) असे मृताचे नाव आहे, तर नीलेश बावणे ३५ वर्ष, रा. डोंगरगाव) असे गंभीर जखमीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अरबिंदा सेन हे दिवाळीनिमित्त आपल्या मूळ गावी बेराबेरिया, पश्चिम बंगाल येथे जाण्याच्या तयारीत होते. त्यासाठी ते डोंगरगाव येथून एमएच ३४ एडब्ल्यू ०१६४ क्रमांकाच्या दुचाकीने नंदोरीकडे येत होते. त्यांच्यासोबत नीलेश बावणे हेही दुचाकीवर होते. दरम्यान, नंदोरी चौकात एमएच ३२ एजे ११११ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की या अपघातात डॉ. अरबिंदा सेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नीलेश बावणे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी नीलेश बावणे यांना तातडीने उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महामार्ग पोलिसांकडून तातडीने मदत -
अपघाताची माहिती मिळताच जाम येथील महामार्ग पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविली. मृत डॉ. सेन यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, समुद्रपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी -
अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातामुळे नंदोरी चौकात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
पश्चिम बंगालमधील कुटुंबावर दुःखाचा डोंगर -
डॉ. अरबिंदा सेन यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. दिवाळीच्या निमित्ताने मूळ गावी जाण्याच्या प्रवासातच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




Petrol Price




