महत्वाच्या बातम्या

 वरोरा पंचायत समितीत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातून जनजागृती


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा पंचायत समिती येथे सखी वन स्टॉप सेंटरच्या अंतर्गत बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचे महत्त्व, त्यांचा मानसिक व आर्थिक विकास तसेच मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, परिवेक्षक अधिकारी अतिश चव्हाण, संरक्षण अधिकारी वरोरा ज्योती चौधरी, जिल्हा समन्वयक चाइल्ड हेल्पलाइन अभिषेक मोहुर्ले, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सोशल वर्कर प्रतिभा माडावी, सखी वन स्टॉप सेंटरच्या पॅरामेडिकल मनीषा देठे तसेच चाइल्ड हेल्पलाइन चंद्रपूरच्या केस वर्कर किरण बोहरा यांची उपस्थिती होती.

यावेळी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना किशोरवयीन मुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळणे, त्यांचा मानसिक विकास होणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. समाजाच्या विकासात मुलींची भूमिका महत्त्वपूर्ण असून, मुलींच्या शिक्षण व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध यंत्रणा व योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइन, सखी वन स्टॉप सेंटर, बाल संगोपन योजना, बालकामगार व बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, दत्तक प्रक्रिया तसेच अनाथ प्रमाणपत्र आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींचे शिक्षण, संरक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्यात आली.





  Print






Related Photos