महत्वाच्या बातम्या

 प्रसूतीदरम्यान नवजात शिशूसह महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच महिलेचाही मृत्यू झाल्याची घटना बल्लारपूर येथील एका रुग्णालयात घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत बल्लारपूर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, संबंधित डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावत उपचारात कोणतीही हलगर्जी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मृत महिलेची ओळख नीलम कुमारी रणधीरकुमार सिंह, अशी झाली आहे. रणधीरकुमार सिंह हे लोको पायलट आहेत. मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता नीलम कुमारी यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे सुमारे ३ वाजता त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, प्रसूतीदरम्यान नवजात मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर नीलम कुमारी यांची प्रकृती खालावली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. प्रसूतीदरम्यान सुमारे एक तास योग्य उपचार व देखभाल करण्यात आली नाही, असा आरोप मृत महिलेचे पती रणधीरकुमार सिंह यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही वेळेत आवश्यक उपचार न मिळाल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, संबंधित डॉक्टरांनी उपचारातील निष्काळजीपणाचा आरोप फेटाळून लावला आहे. महिलेच्या उपचारासाठी रुग्णालयाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवजात बाळाला वाचविण्यासाठी चंद्रपूर येथून डॉक्टरांनाही बोलावण्यात आले होते. बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकली असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर महिलेला मानसिक धक्का बसला आणि त्याचदरम्यान त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर नीलम कुमारी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह बिहारमधील पटना येथे नेण्यात येणार आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि डॉक्टरांकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण यामुळे या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती शवविच्छेदन अहवाल व पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.





  Print






Related Photos