महत्वाच्या बातम्या

 दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत : अश्लील शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विनोद परशुराम पेंदोर (वय ५०, रा. पोंभुर्णा) याच्याविरुद्ध पोंभुर्णा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३२, २२१, २९६ व २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास पोलीस हवालदार पंजाबराव मडावी, ठाणेदार राहुल ठेंगणे व पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोंभुर्णा येथील सावित्रीबाई फुले चौकात एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध मोटारसायकल उभी करून असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

सदर व्यक्तीच्या चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर मार लागल्याचेही दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला रस्त्यावरून बाजूला होऊन घरी जाण्यास सांगितले. मात्र, त्याने पोलिसांचे म्हणणे ऐकण्यास नकार देत त्यांच्याशी हुज्जत घातली. पोलिसांनी वाहनातून खाली उतरून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांना उद्देशून अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

या प्रकारामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्याने आपले नाव विनोद परशुराम पेंदोर असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस हवालदार पंजाबराव मडावी यांच्या लेखी तक्रारीवरून पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.





  Print






Related Photos