महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये यासाठी दक्ष रहा : जिल्हाधिकारी वान्मथी सी


- जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा समन्वय समितीची सभा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : खरीप हंगाम लवकरच सुरू होणार असून मोठ्या प्रमाणावर बियाणे व खतांची विक्री होणार आहे. जिल्ह्यात बोगस व एचटीबीटी बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी. कृषी केंद्रे व सीमावर्ती भागात तपासणी मोहीम राबविण्यात यावी, जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कृषी विभागाला दिले.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, कृषी विकास अधिकारी शिवाजी जाधव, खत वाहतूकदार प्रतिनिधी रवि शेंडे तसेच कृषी व्यवसायी संघाचे अध्यक्ष मनोज भुतडा यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

खरीप हंगाम २०२६-२०२७ साठी एकूण ४ लाख १८ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी ८७ हजार १८४ क्विंटल बियाण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे, असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. रासायनिक खतांच्या मंजूर आवंटनानुसार तालुकानिहाय पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली.

खरीप हंगामासाठी एकूण १ लाख १७ हजार १९० मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून त्यामध्ये युरिया ३६ हजार ७५० मेट्रिक टन, एस.एस.पी. २८ हजार ५५० मेट्रिक टन, एम.ओ.पी. २ हजार ८५० मेट्रिक टन, डी.ए.पी. १३ हजार २४० मेट्रिक टन तसेच संयुक्त खत ३५ हजार ८३० मेट्रिक टन खताचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० तसेच ०७१५२-२५००९९ या क्रमांकावर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos