शहरात बरसल्या पावसाच्या सरी!


- जिल्ह्यात सरासरी अवघा १.९ मि.मी. पाऊस; ४५ पैकी केवळ ८ पर्जन्यमापक मंडळांत नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरात २३ सप्टेंबर रोजी दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. काही काळ वातावरण ढगाळ झाल्याने जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात पावसाचा जोर कमी राहिला. जिल्ह्यातही पाऊस अत्यल्प आणि विखुरलेल्या स्वरूपात झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळू शकला नाही.
जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी दिवसभरात सरासरी केवळ १.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण ४५ पर्जन्यमापक मंडळांपैकी केवळ ८ मंडळांमध्येच पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाअभावी परिस्थिती कायम राहिली.
देसाईगंजमध्ये सर्वाधिक पाऊस -
तालुकानिहाय नोंदीनुसार देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक ९ मि.मी. पाऊस झाला. भामरागड तालुक्यात ८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. याशिवाय एटापल्ली येथे ३.१ मि.मी., आरमोरी येथे १.५ मि.मी., गडचिरोली येथे ०.८ मि.मी. आणि धानोरा येथे ०.५ मि.मी. पाऊस झाला. दुसरीकडे कुरखेडा, कोरची, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांत पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
शंकरपूर येथे १८ मि.मी. पाऊस -
देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर येथे सर्वाधिक १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. काही भागांत दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट होत पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र हा पाऊस मर्यादित भागातच झाल्याने त्याचा जिल्हाभर व्यापक परिणाम जाणवला नाही.
पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा -
खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या अनेक भागांत पाण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यात सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. काही भागांत झालेल्या तुरळक सरींमुळे तात्पुरता गारवा निर्माण झाला असला तरी पिकांसाठी आवश्यक असलेला दमदार व सर्वदूर पाऊस अद्याप झालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आगामी काळातील पावसाकडे लागले आहे. जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्यास खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.




Petrol Price




