भरधाव KTM मोटारसायकलची मोपेडला मागून धडक : दोन प्राध्यापिका जखमी, एकीचा खांदा फ्रॅक्चर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाविद्यालयात जात असताना भरधाव KTM मोटारसायकलने मोपेडला मागून जोरदार धडक दिल्याने दोन प्राध्यापिका जखमी झाल्या. या अपघातात प्रणाली भगवान गौरकर यांच्या डाव्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले, तर प्रियंका विजय मुलचंदानी यांनाही दुखापत झाली. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास विसापूर येथील एस.एन.डी.टी. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर घडली. याप्रकरणी प्रियंका मुलचंदानी यांनी १६ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रियंका मुलचंदानी ३३ वर्षे रा. किल्ला वार्ड, बल्लारपूर आणि प्रणाली भगवान गौरकर या दोघी एस.एन.डी.टी. महाविद्यालय, विसापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रणाली गौरकर बल्लारपूर येथे आल्यानंतर दोघीही त्यांच्या मोपेडने महाविद्यालयाकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.
महाविद्यालयाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर वळण घेत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या KTM मोटारसायकलने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोघीही रस्त्यावर पडल्या. प्रियंका मुलचंदानी यांच्या दोन्ही पायांना, चेहऱ्यावर डोळ्याजवळ आणि डाव्या हाताला मार लागला, तर प्रणाली गौरकर यांच्या डोक्याला आणि डाव्या खांद्याला दुखापत झाली.
अपघातानंतर मोटारसायकलचालक घटनास्थळावरून निघून गेला. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका ऑटोचालकाने दोघींनाही ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रणाली गौरकर यांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे एक्स-रे तपासणीत त्यांच्या डाव्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
या अपघातातील KTM मोटारसायकलचा क्रमांक एमएच २९ एएन २९४८ असून, ती गोलू प्रवीण परचाके २९ वर्षे रा. विसापूर, वॉर्ड क्रमांक ३, बल्लारपूर चालवत असल्याची माहिती मिळाली. दुखापतीमुळे तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करता आली नसल्याचे प्रियंका मुलचंदानी यांनी सांगितले. अखेर १६ ऑक्टोबर रोजी त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली.




Petrol Price




