गडचिरोलीच्या परिवर्तनाची यशोगाथा डिजिटल माध्यमांतून देशभर पोहोचवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


- पुढील ५ ते १० वर्षांत गडचिरोली होणार देशाची स्टील सिटी; एक लाख स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नक्षलवादाच्या प्रभावातून बाहेर पडत गडचिरोली जिल्हा विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सुरक्षा, उद्योग, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाची यशोगाथा देशभर पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सनी पुढाकार घ्यावा. प्रत्यक्ष अनुभव आणि वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे गडचिरोलीची बदलती ओळख डिजिटल माध्यमांतून देशासमोर मांडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित गडचिरोली डिजिटल डेमोक्रसी डायलॉग कार्यक्रमात ते देशभरातून आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्सशी संवाद साधत होते. यावेळी नक्षलवाद निर्मूलन, औद्योगिक विकास, आदिवासींचे हित, रोजगार, भूसंपादन आणि युवकांच्या सहभागासह विविध विषयांवर त्यांनी प्रश्नांना उत्तरे दिली.
पुढील दशकात गडचिरोली ग्रीन स्टील हब -
मुख्यमंत्र्यांनी पुढील पाच ते दहा वर्षांत गडचिरोलीला देशाची स्टील सिटी आणि पर्यावरणपूरक पोलाद उत्पादनाचे ग्रीन स्टील हब बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील खनिज संपत्तीचे मूल्यवर्धन स्थानिक पातळीवरच व्हावे, यासाठी उद्योग उभारण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून एक लाख स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट असून, सध्या उद्योगांमध्ये ७५ ते ८० टक्के रोजगार स्थानिकांना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक युवकांच्या कौशल्य विकासासाठी गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ५० गरीब व आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात खाणकाम क्षेत्रातील प्रशिक्षण घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार -
गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांपर्यंत करण्यात येणार आहे. गडचिरोलीला जोडणाऱ्या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले असून निविदा प्रक्रिया पार पडली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जेएनपीटी आणि वाढवण बंदरापासून नाशिक, जालना, वर्धा मार्गे गडचिरोलीपर्यंत समर्पित मालवाहू रेल्वे कॉरिडॉर उभारण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नक्षलवादाच्या प्रभावातून जिल्ह्याची मुक्तता -
नक्षलवादाच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस आणि सी-६० जवानांच्या शौर्यामुळे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात मोठे परिवर्तन घडले आहे. जिल्ह्यातील सुरक्षा परिस्थितीत सुधारणा झाली असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी शासन प्रयत्नशील आहे. दुर्गम भागांत रस्ते, वीज, पाणी आणि शासकीय योजनांचा लाभ पोहोचल्यामुळे नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासींच्या हिताला प्राधान्य -
औद्योगिक विकास करताना स्थानिक आदिवासींचे हित, जंगलांचे संवर्धन आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण यांना प्राधान्य दिले जाईल. भूसंपादन प्रक्रियेत बळजबरीऐवजी शेतकऱ्यांशी संवाद साधून विकास प्रकल्प पुढे नेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. औद्योगिकीकरणामुळे शहरात वाहतूक कोंडी आणि अनधिकृत वस्त्यांची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी बाह्यवळण मार्ग आणि कामगारांच्या निवासव्यवस्थेचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार बंटी भांगडिया, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील इन्फ्लुएन्सर्सनी गडचिरोलीतील विकासकामे, आदिवासी कला-संस्कृती आणि स्थानिक परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित भगवान बिरसा कला संगम उपक्रमाची माहितीही यावेळी देण्यात आली. गडचिरोलीचा विकासप्रवास, आदिवासी संस्कृती आणि नव्या औद्योगिक संधी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.




Petrol Price




