साकिनाका प्रकरण : परप्रांतीयांची नोंद ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
साकीनाका प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे परप्रांतीयांची नोंद ठेवा, असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 'राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो? कुठे जातो?' याची नोंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. राज्यातील महिला अत्याचारांवर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत हे आदेश दिले.
मुंबईतल्या साकीनाका निर्भया प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. रविवारपासून सुरू झालेले उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सोमवारीही सुरू होते. राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो, कुठे जातो, याची नोंद ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पोलीस महासंचालक कार्यालयात काल गृहविभागाची आढावा बैठकीत झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. 
राज्याला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतील साकिनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींने गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी महिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या आरोपीवर ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच हे प्रकरण संवेदनशील असल्याने या प्रकरणी राजा ठाकरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही  हेमंत नगराळे यांनी दिली. आतड्यांना मार लागल्यामुळे पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. पीडित महिला आणि आरोपी 4 ते 5 वेळा भेटले होते. अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली. 
  Print


News - Rajy | Posted : 2021-09-14


Related Photos