शेतातून घरी परतताना महिलेवर वाघाची झडप : बैलांमुळे हल्ल्याचा डाव फसला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतातील काम आटोपून बैलांना घेऊन घराकडे परतणाऱ्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घातल्याची थरारक घटना गोंडपिपरी तालुक्यातील चेक सोमनपल्ली शेतशिवारात सोमवार ५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रोजा शिवमोहन उराडे जखमी झाल्या असून, त्यांच्यावर गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोजा उराडे या शेतातील काम आटोपून बैलांना घेऊन घराकडे परतत होत्या. यावेळी शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घेतली. वाघाच्या अचानक हल्ल्यामुळे बैल घाबरले आणि त्यांनी धाव घेतली. वाघाने एका बैलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र बैलांनी वेगाने धाव घेतल्याने वाघाचा डाव फसला. या गोंधळात वाघाच्या हल्ल्यात रोजा उराडे जखमी झाल्या.
घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तातडीने जखमी महिलेला गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेची भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली असून, पंचनामा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे चेक सोमनपल्ली परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात वाघाचा वावर असल्याने शेतीची कामे करताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक एम.डी. पेंदोर, वनरक्षक एस.जी. नगोरे, महिला वनरक्षक सोनी मयुरीवार, महिला वनरक्षक भिवापूरे, वनरक्षक एस.जी. झारखंडे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी रुग्णालयात रोजा उराडे यांची भेट घेतली.




Petrol Price




