कोतवाल पदाच्या ९ रिक्त जागांसाठी २८ सप्टेंबरला आरक्षण सोडत


- मनगाव, बरबडीसह नऊ ठिकाणच्या रिक्त पदांचे आरक्षण निश्चित होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या अधिनस्त कोतवाल पदांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण ९ रिक्त पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता समुद्रपूर तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार समुद्रपूर तहसील कार्यालयांतर्गत विविध गावांमध्ये रिक्त असलेल्या कोतवाल पदांचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी तालुका प्रशासनाकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
या नऊ ठिकाणच्या जागांचा समावेश -
समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मनगाव, बरबडी, गिरड, नारायणपूर, कोरा, परडा, रामनगर, धामणगाव आणि निंभा या नऊ ठिकाणी कोतवाल पदे रिक्त आहेत. या सर्व ९ पदांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून, इच्छुक नागरिकांना या प्रक्रियेस उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली आहे.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन -
आरक्षण सोडत प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता समुद्रपूर तहसील कार्यालयातील सभागृहात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका निवड समिती, समुद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीनंतर संबंधित रिक्त कोतवाल पदांच्या भरती प्रक्रियेला पुढील दिशा मिळणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.




Petrol Price




