महत्वाच्या बातम्या

 अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध : भंडारा जिल्ह्यातील ९०० शेतकऱ्यांचा समावेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ९०० पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची चौथी यादी २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा येथील विलास देशपांडे यांनी ही माहिती दिली.

शासन निर्णयानुसार, महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर जिल्ह्यातील एकूण ३० हजार ५९४ कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली होती. संगणकीय प्रक्रियेनंतर आतापर्यंत चार टप्प्यांत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीत २२ हजार ३३६, दुसऱ्या यादीत २ हजार ५९१, तिसऱ्या यादीत १ हजार ३७४, तर चौथ्या यादीत ९०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.

बायोमेट्रिक आधार प्रमाणिकरण आवश्यक -
योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आधार प्रमाणिकरणासाठी एसएमएस पाठविण्यात येत आहेत. तसेच लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कार्यालये आणि संबंधित बँकांच्या शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्वतंत्र विशिष्ट क्रमांक (युनिक नंबर) देण्यात आला आहे. शेतकरी आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आपले आधार प्रमाणिकरण पूर्ण करू शकतात.

भंडारा जिल्ह्यातील कार्यरत आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आधार प्रमाणिकरण केवळ बायोमेट्रिक पद्धतीनेच करण्यात येणार असून, त्यासाठी ओटीपीचा वापर केला जाणार नाही, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

प्रमाणिकरणानंतर कर्जमुक्तीची रक्कम खात्यात -
पात्र लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणिकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच योजनेचा लाभ डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे संबंधित कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक आधार प्रमाणिकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे योजनेचा लाभ मिळण्याच्या प्रक्रियेत अडचणी येणार नाही.





  Print






Related Photos