महत्वाच्या बातम्या

 बल्लारशाह रेल्वे रनिंग रूममधील ठेका कामगारांना दिलासा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे रनिंग रूममधून कामावरून कमी करण्यात आलेल्या ठेका कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश सहायक श्रम आयुक्त केंद्रीय, चंद्रपूर प्रशांत सिंह यांनी दिले आहेत. कामगारांच्या हितासाठी लागू असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही रेल्वे प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या बल्लारशाह लोको पायलट व ट्रेन मॅनेजर रनिंग रूमचे कंत्राट अमित फॅब्रिकेटर्स अँड एरिकेटर्स या संस्थेकडे आहे. या ठिकाणी कार्यरत ठेका कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे यांनी सहायक श्रम आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची दखल घेत श्रम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून २२ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश महासचिव अजय दुबे, मुख्य लोको निरीक्षक अन्नम वेंकटेश, ठेकेदाराचे प्रतिनिधी विकास सिंह आणि कामगार नेते अभिषेक ईदनरी उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान कामगारांच्या तक्रारी आणि संबंधित बाबींची चर्चा करण्यात आली.

त्यानंतर कामावरून कमी करण्यात आलेल्या ठेका कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कामगार कायदे व नियमांचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही रेल्वे अधिकारी आणि ठेकेदाराला देण्यात आला. या निर्णयामुळे बल्लारशाह रेल्वे रनिंग रूममधील संबंधित ठेका कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.





  Print






Related Photos