महत्वाच्या बातम्या

 दुष्काळ निवारण, चारा लागवड व पीक नियोजनासाठी एकात्मिक उपाययोजनांवर भर


- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पाणी, शेती आणि पशुधन यांचे एकात्मिक नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंधारण, चारा उत्पादन, पीक नियोजन आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना प्राधान्य देऊन विविध शासकीय योजनांच्या अभिसरणातून गावांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या वतीने प्रियदर्शिनी  सभागृह येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा व पुरस्कार वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यासोबतच दुष्काळ निवारण चर्चासत्र तसेच चारा लागवड व पीक नियोजन कार्यशाळाही घेण्यात आली.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांची स्थिती, जलसंधारणाची कामे आणि रब्बी हंगामातील पीक नियोजन याबाबत पूर्वतयारी करण्याच्या सूचना कार्यशाळेत देण्यात आल्या. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून शेती व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. प्रत्येक गटविकास अधिकारी व संबंधित विभागप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा नियमित आढावा घ्यावा, असेही मार्गदर्शनात सांगण्यात आले.

संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. शासनाच्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार गायरान तसेच वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५०२ तलावांच्या परिसरात चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जिल्हा वार्षिक योजना व विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३.५७ लाख मेट्रिक टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ज्वारी, मका, बाजरी, नेपियर गवत आदी चारा पिकांच्या लागवडीसह मुरघास निर्मिती, कडबा कुट्टी आणि अझोला उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. चारा उत्पादनाच्या कामांमध्ये महिला बचत गटांचा सहभाग वाढवून ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.

समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांचा सर्वांगीण विकास : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२६-२७ हे केवळ पुरस्कार मिळविण्यापुरते मर्यादित नसून गावांच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय विकासाची महत्त्वपूर्ण संधी आहे. या अभियानांतर्गत सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, योजनांचे अभिसरण, संस्था बळकटीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदान या आठ घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

अभियानाचा कालावधी ३१ मार्च २०२७ पर्यंत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील उपलब्ध साधनसंपत्ती, अपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या गरजांचा विचार करून ग्रामपंचायतनिहाय ठोस कृती आराखडा तयार करावा. ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचे नेतृत्व करणारी सक्षम संस्था बनली पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले. योजनांच्या अभिसरणातून रोजगार व उपजीविकेला चालना : रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे करून निर्माण झालेल्या जलसाठ्याचा उपयोग चारा लागवडीसाठी करावा. चारा उपलब्धतेमुळे पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना मिळेल. त्याचबरोबर महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग व रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. अशा प्रकारे जलसंधारण, चारा उत्पादन, पशुसंवर्धन आणि उपजीविका विकासाची कामे एकत्रितपणे राबविण्यावर भर देण्यात आला.

यासाठी ग्रामपंचायत, कृषी, पशुसंवर्धन, रोजगार हमी, मृद व जलसंधारण तसेच महिला व बालविकास विभागांनी समन्वयाने काम करावे. पंचायत समिती स्तरावर नियमित आढावा घेऊन अंमलबजावणीतील अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचा गौरव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत चिंतलबधाबा,  सागरा आणि  जिबगाव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना साळुंखे, नूतन सावंत, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक गिरीश धायगुडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos