महत्वाच्या बातम्या

 गणरायाच्या चरणी पहारा, मात्र भक्तांच्या खिशावर चोरट्यांचा डल्ला : दोन मोबाईल लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणरायाच्या मूर्तीची रात्रभर सुरक्षा करण्यासाठी मंडपातच झोपलेल्या युवकांना सकाळी जाग आली आणि आपल्या खिशातील मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले. वरोरा येथील कर्मवीर वॉर्डातील किंग कंपनी गणेश मंडळाच्या मंडपात घडलेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी रात्रभर मंडपात मुक्काम केलेल्या युवकांनाच चोरट्याने लक्ष्य केल्याने नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे.

२० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता मैनक विलास निकारे १९ वर्ष, गणेश सुधाकर सोयाम यांच्यासह मंडळाचे अन्य सदस्य मंडपात झोपले होते. पहाटेपर्यंत सर्वजण मंडपातच असताना अज्ञात चोरट्याने दोघांच्या पँटच्या खिशातून मोबाईल अलगद लंपास केले.

२१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास उठल्यानंतर मैनक निकारे याला त्याच्या खिशातील सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल दिसून आला नाही. त्यानंतर गणेश सोयाम याचाही सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल गायब असल्याचे समोर आले. काही क्षणांतच दोन्ही मोबाईल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने युवकांना धक्का बसला. चोरीला गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १८ हजार रुपये आहे.

दरम्यान, मंडपाजवळ राहणाऱ्या सुषमा कमलाकर मिलमिले यांनी पहाटे सुमारे ५ वाजता गणेश मंडळाच्या बाहेरून एक अज्ञात व्यक्ती जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे याच व्यक्तीवर चोरीचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर युवकांनी वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला असून, गणेश मंडपातच घडलेल्या या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





  Print






Related Photos