प्रारूप मतदार यादी जाहीर : २ लाख ७० हजार १५३ अनकाऊंटेबल मतदारांची पडताळणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हाधिकारी वसूमना पंत यांच्या उपस्थितीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मतदार यादी आणि पुनरीक्षण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. बैठकीत मतदान केंद्रांचे अंतिम सुसूत्रीकरण, मतदारांची संख्या, मतदार यादीत नाव नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती व स्थलांतरासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, आयोगाने मान्य केलेली कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी तसेच मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
एसआयआरमधील मागील मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील, आजी-आजोबांच्या तपशिलाशी जुळवणी न झाल्यास तसेच नवीन नोंदणीच्या वेळी आयोगाने निश्चित केलेल्या १२ कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये जन्म दाखला, पासपोर्ट, दहावीचे किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र, राज्य किंवा स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, शासनाचे जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, १ जुलै १९८७ पूर्वी शासन किंवा संबंधित संस्थांनी दिलेले ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र आणि आधार कार्ड यांचा समावेश आहे.
नवमतदारांना नोंदणीची संधी सध्याच्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना नमुना क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी निर्धारित प्रक्रियेनुसार नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृत व दुबार मतदारांची नावे वगळता येणार मतदार यादीतील मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित अथवा दुबार नोंद असलेल्या मतदारांचे नाव वगळण्यासाठी संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार नमुना क्रमांक ७ भरून हरकत नोंदवू शकतो. तसेच मतदार यादीतील नाव, वय, नातेसंबंध, छायाचित्र आदी तपशिलांमध्ये दुरुस्ती, पत्ता बदल किंवा दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे. दुबार नोंदणीस कायदेशीर बंदी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मधील कलम १७ व १८ नुसार एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदविता येत नाही.
सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणीच गणना अर्ज भरणे बंधनकारक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा वगळण्यासाठी खोटी घोषणा अथवा चुकीचे विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.
राजकीय पक्षांच्या बीएलएना पडताळणीचे आवाहन सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या (बीएलए) माध्यमातून प्रारूप मतदार यादी तसेच २ लाख ७० हजार १५३ अनकाऊंटेबल मतदारांच्या यादीची सखोल पडताळणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.
मतदारांना कोणत्याही प्रकारची माहिती किंवा मदत हवी असल्यास १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच ECINET ॲप आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरूनही आवश्यक माहिती उपलब्ध होणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी वसूमना पंत, अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संजीव देशमुख, तहसीलदार विजय पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




Petrol Price




