महत्वाच्या बातम्या

 शिवणी येथे पत्त्यांचा जुगार : चौघे जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रामपंचायतीच्या विद्युत पोलच्या प्रकाशात सार्वजनिक चौकात गोलाकार बसून पैशांची बाजी लावत तीन पत्त्यांचा हारजीतचा जुगार खेळणे शिवणी येथील चौघांना चांगलेच महागात पडले. गडचिरोली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पहाटेच्या सुमारास धाड टाकून जुगार खेळणाऱ्या चौघांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ९ हजार ६०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे पत्ते जप्त केले. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास शिवणी येथील सार्वजनिक चौकात करण्यात आली. या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराच्या प्रकाराला आळा घालण्यास पोलिसांना यश आले.

पोलिस हवालदार लहुराज विठ्ठलराव नागरगोजे यांना शिवणी येथील चौकात काही जण पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री केल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी शिवणी ग्रामपंचायतीच्या विद्युत पोलच्या प्रकाशाखाली काही जण गोलाकार बसून तीन पत्त्यांचा हारजीतचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दीपक दामोदर गावतुरे ३० वर्षे, रुमाजी राजीराम मोहुर्ले ३८ वर्षे, माणिक जागेश्वर दुधे ४० वर्षे आणि भाऊराव डंबाजी समर्थ ३८ वर्षे, सर्व रा. शिवणी यांना ताब्यात घेतले.

९ हजार ६०० रुपयांची रोकड जप्त -
पोलिसांनी आरोपींकडून तसेच घटनास्थळावरून जुगाराचे पत्ते आणि ९ हजार ६०० रुपये रोख पंचांसमक्ष जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये ५०० रुपयांच्या ७ नोटा, २०० रुपयांच्या २० नोटा आणि १०० रुपयांच्या २१ नोटांचा समावेश आहे.

या प्रकरणी पोलिस हवालदार लहुराज नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर नाथाजी रूपवते करीत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगाराच्या प्रकारावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शिवणी परिसरात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या अवैध गतिविधींविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.





  Print






Related Photos