आरटीआय अर्जावरून कोळसा खाण कार्यालयात गोंधळ : दोन महिलांविरुद्ध गुन्हा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोळसा खाण कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करून आरडाओरड, शिवीगाळ, धमकी देणे तसेच कार्यालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, विकास शंकर कापसे (वय ३६), रा. सास्ती धोपटाळा टाउनशिप, ता. राजुरा हे बल्लारपूर कॉलरीच्या तीन व चार पिट्स भूमिगत खाणीत उपप्रबंधक (मानव संसाधन) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास दोन महिला कोणतीही परवानगी न घेता खाण कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी आरटीआय अर्ज स्वीकारण्याच्या कारणावरून कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आरडाओरड व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिलांनी कार्यालयात मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण केले तसेच कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या. त्यानंतर १२ मे रोजी फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित व्हिडीओ प्रसारित करून भ्रष्टाचारी, कामचोर अशा स्वरूपाचे आरोप केल्यामुळे कार्यालयाची व अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
खान अधिनियम १९५२ व कोळसा खान विनियम २०१७ नुसार संवेदनशील खाण परिसरात विनापरवानगी प्रवेशास मनाई असतानाही संबंधित महिलांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात प्रिया परमेश्वर झामरे व तिच्यासोबत असलेल्या एका महिलेविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३१, ३(५), ३२९(३), ३५१(२), ३५२ व ३५६(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




