जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांची ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉन


- ५०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ड्रग फ्री गडचिरोली या जनजागृतीपर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. व्यसनमुक्त, निरोगी व सुरक्षित समाजाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी-अंमलदार तसेच विद्यार्थ्यांसह ५०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन १९८८ पासून २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्ताने अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, व्यसनमुक्त समाज घडविणे आणि नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने या विशेष मॅरेथॉनचे आयोजन केले.
शुक्रवारी २६ जून सकाळी ६.३० वाजता पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथून महिला महाविद्यालय (लॅडमार्क हॉटेल) चौकापर्यंत ५ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध शाखांचे अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत व्यसनमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.
मॅरेथॉनचा समारोप शहीद पांडू आलाम सभागृह येथे झाला. यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते सर्व सहभागींचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक एम. रमेश म्हणाले की, अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे समाजासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले असून, त्याविरोधात जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. व्यसनमुक्त, निरोगी आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. अंमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि व्यापक जनजागृतीवर गडचिरोली पोलीस दल विशेष भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्यासह विविध शाखांचे अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गडचिरोली पोलीस दलातील सर्व शाखांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
News - Gadchiroli




Petrol Price




