महत्वाच्या बातम्या

 मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून महिलेची १० लाखांची फसवणूक : लैंगिक अत्याचाराचा आरोप


- पाचपावली पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; धमकी दिल्याचाही महिलेचा आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून १०.४६ लाख रुपये उकळल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध फसवणूक, बलात्कार आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपींची नावे मोहम्मद शाफत शेख (२८) आणि मोहम्मद नावेश शेख (२६) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार महिलेला मालमत्तेच्या व्यवहारातून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या आमिषामुळे महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी विविध कारणे सांगून तिच्याकडून वेळोवेळी १०.४६ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, आर्थिक व्यवहारानंतर आरोपींनी तिच्यावर दबाव टाकत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या प्रकाराला महिलेने विरोध केला असता आरोपींनी तिला तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

घडलेल्या प्रकाराची माहिती कोणालाही दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्यामुळे महिला काही काळ शांत राहिली. मात्र, आरोपींकडून वारंवार त्रास होत असल्याने अखेर तिने धैर्य दाखवत पाचपावली पोलिस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींची भूमिका, आर्थिक व्यवहार आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.

आर्थिक व्यवहार आणि पुराव्यांची तपासणी सुरू -
या प्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार महिला यांच्यात नातेवाईकीचे संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून दोघांमधील आर्थिक व्यवहार, कागदपत्रे, संदेश तसेच इतर उपलब्ध पुराव्यांची तपासणी केली जात आहे. तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos