महत्वाच्या बातम्या

 कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर : खेत बचाओ अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि किडींचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर जमिनीचे आरोग्य टिकवून शाश्वत शेतीकडे वळणे गरजेचे झाले आहे. यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने खेत बचाओ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांनी शेतकऱ्यांना सद्यस्थितीत पिकांचे संरक्षण कसे करावे आणि जमिनीची सुपीकता कशी टिकवावी, यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.

रासायनिक खतांच्या अतिवापराबद्दल चिंता व्यक्त करत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर वाढविणे तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.

सोयाबीनच्या पिडीकेव्ही आंबा सारख्या विद्यापीठ विकसित सुधारित वाणांचा वापर करावा, असे मार्गदर्शन वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ.जीवन कतोरे यांनी केले, तसेच अल निनो किंवा पावसाच्या अनिश्चित खंडामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी व पाणी टंचाईच्या काळात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, याविषयी  शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीकडून तंत्रज्ञानयुक्त शेतीकडे वळण्याची वेळ आली आहे, असे मत प्रगतीशील शेतकरी दिलीप पोहाणे यांनी व्यक्त केले. अंशुभ दिघाडे यांनी आंबा पिकातील शेतीचा अनुभव कथन केला.

कापूस, सोयाबीन आणि तुरीवरील किडींच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता, निंबोळी अर्क, कामगंध सापळे आणि पिवळे चिकट सापळे वापरण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे मित्रकिडींचे रक्षण होऊन खर्च कमी होतो, असे डॉ. निलेश वझिरे यांनी सांगितले. सोयबीन पिक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन एकरी उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असे डॉ.भारती तिजारे यांनी सांगितले.

खेत बचाओ अभियान केवळ एक मोहीम नसून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेती शाश्वत करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या अभियानामुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञान थेट शेताच्या बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विषयतज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता इरफान अली, माधव घोडे, अजय झाडे, प्रीतम कडू, गजेंद्र मानकर, गणेश वायरे व ग्रामस्थांनी योगदान दिले, असे कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos