महत्वाच्या बातम्या

 बाळ तस्करीतील मुख्य आरोपी अजय फुलझेले अखेर जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मानवी तस्करी आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपी अजय प्यारेलाल फुलझेले (वय २६) याला रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी चंद्रपूर शहरातून अटक केली. २७ मे २०२६ पासून नागपूरहून फरार असलेला हा आरोपी जलनगर वार्ड, कंजर मोहल्ला येथे गीताबाई कंजर यांच्या घरी भाड्याने राहत होता.

रामनगर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ७०३/२०२६ अन्वये कलम ६४(२)(एफ), (आय), (एम), १४३(२), १४३(३), १४३(४), १४३(५), ११५(२), ३५२(२) भा.न्या.सं. सह कलम ४, ६, ८, १२ पॉक्सो कायदा व कलम ७५, ८०, ८१ बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

आरोपी अजय फुलझेले एका विधवा महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या संबंधातून त्याला दोन अपत्ये झाली. आरोपीने या दोन्ही बालकांची प्रत्येकी दोन लाख रुपयांना विक्री केली. त्यातील एक बालक तेलंगणा राज्यातील कागजनगर येथे तर दुसरे चंद्रपुरात विकण्यात आले.

तपासात समोर आले की, आरोपीने त्या विधवा महिलेच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशीही संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीने आरोपीने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना मुलीच्या वयाबाबत संशय आला. त्यांनी तात्काळ अजनी पोलीस स्टेशनला माहिती दिली.

या माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी कारवाई करत यापूर्वीच तीन महिलांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी अजय फुलझेले २७ मे पासून फरार होता.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. स.पो.नी. शिवाजी नागवे, पो.उप.नी. कृष्णा दराडे यांच्यासह पो. हवा. आनंद खरात, जितेंद्र आकरे, शरद कुडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, प्रकाश बलकी, म.पो.हवा. मनिषा मोरे, संदिप कामडी रविकुमार ढेगळे, पंकज ठोंबरे, प्रफुल पप्पुलवार, सुरेश कोरवार , पंकज पोंदे, संदिप गेडाम , प्रकाश मडावी ,व म.पो.अं. ब्ल्युटी साखरे यांनी बुधवारी आरोपीला चंद्रपूर शहरातून ताब्यात घेतले.

आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस या रॅकेटमधील इतर कड्यांचा शोध घेत आहेत. तेलंगणा व स्थानिक पातळीवरील खरेदीदारांचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos