आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या वतीने आदर्श महाविद्यालय संस्था स्नेही पुरस्काराने सन्मानित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा गेल्या ३९ वर्षांपासून पुर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात सामाजिक कार्य करीत आहे. या संस्थेला सामाजिक कार्य करीत पुढील यशस्वी वाटचाल करताना अनेक क्षेत्रातील व्यक्ती, गट व संघटनांचे मोलाचे सहकार्य लाभत असते. मिळालेल्या सहकार्याप्रती कृतज्ञता म्हणून संस्थेच्या वतीने दरवर्षी अनेक पुरस्कार जाहीर केले जातात. महाविद्यालयाचे संस्थेसोबत मागील काही वर्षांपासून समन्वय व महत्वाचे सहकार्य असल्यानेच आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या राणी दुर्गावती प्रशिक्षण केंद्र, उराडी येथे आयोजित वार्षिक स्नेहमिलन २०२२-२३ चा उत्कृष्ट संस्था स्नेही पुरस्कार आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला प्रदान करून गौरविण्यात आले. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था, कुरखेडा आणि या संस्थेशी संलग्नित दिशा दिव्यांग संघटना, देसाईगंज यांचेशी आदर्श महाविद्यालयाचे गेली काही वर्षांपासून समन्वय स्थापित आहे. महाविद्यालयाने यांच्या सहकार्याने महाविद्यालयात जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा आयोजित करून दिव्यांगांना सोयीसुविधा व शासकीय योजनांची माहिती देणे, स्त्री हिंसा विरोधी सप्ताह अंतर्गत माणूस जगवू, माणूस घडवू विषयावर व्याख्यान आयोजित करणे, दिशा दिव्यांग संघटनेच्या नियमित मासिक सभेला महाविद्यालयाचे सभागृह उपलब्ध करून देणे, कोरोना काळात दिव्यांगांना फूड किट देणे तसेच काही दिव्यांगांना दुर्धर आजारावरील उपचारासाठी आर्थिक मदत करणे, इत्यादी महाविद्यालयाने आम्ही आमच्या आरोग्यासाठी व दिव्यांग संस्थेला अनेक स्वरूपाचे सामाजिक व आर्थिक सहकार्य केल्याने उत्कृष्ट संस्था स्नेही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते आदर्श महाविद्यालयाला देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी स्विकारला आणि सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, पुरस्कार हा कोण्या एकाची उपलब्धी नसून महाविद्यालयात कार्यरत प्रत्येक घटकाची ती उपलब्धी आहे. तेव्हा हा पुरस्कार महाविद्यालयाच्या त्या प्रत्येक घटकाला समर्पित आहे. पुरस्काराबद्दल संस्थेचे धन्यवाद मानून भविष्यात शक्य तितके सहकार्य महाविद्यालयाच्या वतीने केले जाईल, असा विश्वासही दिला व संस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
News - Gadchiroli