महत्वाच्या बातम्या

 नौदलाची तेजस कामगिरी : आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठे पाऊल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : भारतीय नौदलाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. नौदलाने काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका ताफ्यात दाखल केले. या विमानवाहू युद्धनौकेवरून प्रथमच तेजस विमानांनी लँडिंग आणि टेकऑफ केले. विशेष म्हणजे तेजस ही फायटर जेट्सही संपूर्ण भारतीय बनावटीची आहेत.

नौदलासाठी तेजसच्या विमानांमध्ये खास बदल करण्यात आले. नौदलाच्या विमानवाहू युद्धनौकांच्या अतिशय छोट्या आकाराच्या धावपट्टीवरून लँडिंग आणि टेकऑफ करण्यासाठी त्यात अनेक तांत्रिक बदल केले आहेत. याआधी भारताच्या विमानवाहू युद्धनौकांच्या ताफ्यात रशियन बनावटीची मिग २९ के (Mig २९ K) जातीची विमाने होती. भारतीय बनावटीची तेजस विमाने विक्रांतवर यशस्वीरित्या उतरवल्यामुळे आत्मनिर्भर भारत अंतर्गत एक मोठे पाऊल भारताने टाकले.

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आणि त्यावरील लढाऊ विमानांचा संपूर्ण भारतीय बनावटीचा ताफा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. विक्रांतवरील विमानांच्या ताफ्यासाठी या आधी फ्रान्सची राफेल आणि अमेरिकेच्या एफ ए १८ सुपर हॉर्नेट या विमानांच्या चाचण्या झाल्या आहेत. राफेल एम व्हेरियंटला नौदलाची पसंती असल्याची माहिती आहे. त्यातच आता भारतीय तेजस विमानांच्या यशस्वी चाचणीने भारतीय लष्करी संशोधन क्षेत्रात मोठ्या संधी आणि अपेक्षा निर्माण केले आहेत.

तेजस विमाने याआधीच वायुदलात दाखल झाली आहेत. आता भारताचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेली ही विमाने नौदलाच्या ताफ्यात आल्यास परदेशी महागडी विमाने घेण्याचा भारताचा खर्चही कमी होईल. तेजस विमाने विकत घेण्याची इच्छा याआधीच अनेक देशांनी व्यक्त केले. या यशस्वी चाचण्यांमुळे संरक्षण उत्पादन निर्यात क्षेत्रात भारताला आणखी एक नवे आकाश उपलब्ध होईल.





  Print






News - Rajy




Related Photos