महत्वाच्या बातम्या

 निवृत्ती समारंभानंतर घरफोडी : बल्लारपुरात ९.३० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : निवृत्ती समारंभ आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले तब्बल ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची गंभीर घटना बल्लारपूर शहरातील टिळक वॉर्ड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी शारदा किशोर तांड्रा (वय ५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती किशोर तांड्रा हे डब्ल्यूसीएलमधून ३९ वर्षांची सेवा पूर्ण करून नुकतेच निवृत्त झाले होते. त्यानिमित्त तसेच विवाह दिनाच्या निमित्ताने १० मे रोजी त्यांच्या निवासस्थानी कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी परिधान केलेले सर्व सोन्याचे दागिने ११ मेच्या पहाटे घरातील शेवटच्या खोलीत असलेल्या भीतीच्या कप्प्यातील स्टीलच्या डब्यात ठेवले होते.

दरम्यान, १२ मे रोजी दुपारी पती गावाला जाण्याच्या तयारीत असताना दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी संबंधित डबा उघडण्यात आला. मात्र त्यामध्ये केवळ रोख रक्कम दिसून आली, तर सर्व सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे लक्ष्मी हार, नेकलेस, काळीपोत, चैन, गोफ, बाळ्या आणि झुमके यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ९ लाख ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाह सयाम पुढील तपास करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos