चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
![](images/line-6.png)
![](images/line-6.png)
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्राची चिंता वाढवणारे वृत्त नुकतेच समोर आले आहे. परदेशवारी करून राज्यात परतलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये आलेल्या या नागरिकांना कोरोनाच्या BF.7 या घातक विषाणूचीच लागण झाल्यामुळे आता चिंता वाढली आहे. कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार माजवणारा हा विषाणू राज्यात शिरकारव करतो हे पाहून आता आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
मुंबईत दाखल झालेल्या या तीन कोरोनाबाधित प्रवाशांपैकी दोन प्रवासी चीनमधून आले होते तर एक प्रवासी कॅनडाहून आला होता अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. प्राथमिक सावधगिरी म्हणून या तिघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तिनही कोरोनाबाधितांनी लस घेऊनही त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, चीनमध्ये दर दिवसागणिक वाढणारा कोरोनाचा धोका पाहता, देशातील विमानतळांवर केल्या जाणाऱ्या RTPCR चाचण्यांमध्ये जे नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आढळत आहेत त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. केंद्र सरकारकडूनच यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा फैलाव संपूर्ण देशासाठी सध्या चर्चेचा मुद्दा ठरत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख पाहता सध्या केरळ राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. सरकारकडून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार सार्वजनिक ठिकाण, कार्यालयं अशा ठिकाणांवरही हा नियम लागू असेल. राज्यातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करावे असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
पुढील 30 दिवस म्हणजेच साधारण महिनाभर हे नियम केरळमध्ये लागू असणार आहेत. सदरील नियमांअंतर्गत केरळमध्ये दुकाने, सिनेमागृह आणि तत्सम ठिकाणांवर सॅनिटायझरचाही वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत पुन्हा एकदा आपल्याला त्याच दिवसांमध्ये माघारी नेते का अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
News - Rajy