महत्वाच्या बातम्या

 पोंभूर्णा पोलिसांकडून जप्त दारूसाठ्याची विल्हेवाट : १४.५८ लाखांच्या मद्यावर फिरवला रोड रोलर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोंभूर्णा पोलीस ठाण्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने मागील सहा वर्षांत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल १४ लाख ५८ हजार ५१० रुपयांच्या अवैध दारूसाठ्याचा नाश केला. या कारवाईत पोलिस ठाण्यासमोरील सिमेंट रस्त्यावर दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर फिरवून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोंभूर्णा पोलीस ठाण्यात सन २०२० ते २०२६ या कालावधीत नोंद झालेल्या ८५ गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यामध्ये ३९४ पेट्या व ११ किरकोळ देशी दारूच्या बाटल्या तसेच ५ पेट्या व ६ किरकोळ विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता. या संपूर्ण जप्त मालाची किंमत १४ लाख ५८ हजार ५१० रुपये इतकी होती.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांच्या कार्यालयीन आदेशानुसार या जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दारूच्या सर्व बाटल्या पोलिस ठाण्यासमोरील मुख्य सिमेंट रस्त्यावर ठेवून त्यावर रोड रोलर फिरविण्यात आला. त्यानंतर फुटलेल्या काचा व रिकाम्या बाटल्यांचा चुरा सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आला.

ही कारवाई पोंभूर्णा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग राजुरा येथील दुय्यम निरीक्षक एस. टी. धीडसे, पोलीस कर्मचारी आणि अधिकृत पंच यांच्या उपस्थितीत पार पडली.

संपूर्ण प्रक्रियेचा रीतसर दारूनाश पंचनामा करण्यात आला असून पारदर्शकता राखण्यासाठी कारवाईचे व्हिडिओ चित्रण व छायाचित्रणही करण्यात आले. तसेच या कारवाईची नोंद पोंभूर्णा पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मूल) सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोंभुर्णा पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल ठेंगणे व पोलीस स्टाफ ने केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos