माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

- आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या आंतरराज्यीय अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले नष्ट
- ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत पुन्हा एकदा माओवादी शस्त्रसाठा जप्त ज्यामध्ये ०१ नग इन्सास रायफल, ०२ नग सिंगल शॉट रायफल, ०२ नग १२ बोअर रायफल व एकूण १८ जीवंत काडतूस यांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता संपूष्टात आला असून, गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपूष्टात आली आहे. सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हेे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये लपवून ठेवले जात असे.
त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात २३ मे २०२६ रोजी केलेल्या कारवाईसोबतच २७ मे २०२६ रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची सखोल चौकशी केली असता, माओवाद्यांनी पोस्टे काकूर जि. नारायणपूर (छ.ग.) पासून ०७ किमी अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात शस्त्र तसेच शस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने २६ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात संयुक्त आंतरराज्यीय अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये विशेष अभियान पथक प्राणहिता येथील ०४ तुकड्या, डीआरजी नारायणपूरचे ०१ पथक व बिडीडीएस प्राणहिताचे ०२ पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते. २७ मे २०२६ रोजी पोस्टे काकूर, जि. नारायणपूर (छ.ग.) पासून ०७ किमी अंतरावर असलेल्या जंगल परिसरात पथकांकडून शोध अभियान राबवून बिडीडीएस पथकांद्वारे सदर जंगल परिसराची कसून तपासणी केली असता, ०१ नग इन्सास रायफल, ०२ नग सिंगल शॉट रायफल, ०२ नग १२ बोअर रायफल, एसएलआर रायफलचे ०२ जीवंत काडतूस, .३०३ रायफलचे १२ जीवंत काडतूस, १२ बोअर रायफलचे ०४ जीवंत काडतूस, २५ किग्रॅ आय.ई.डी. स्फोटक,०२ नग क्लेमोर, ११०० डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, ५०० पेक्षा अधिक बिजीएल सेल व बिजीएल सेल बनविण्याचे साहित्य, ०७ नग बिजीएल लाँचर,०३ नग ट¬ुब लाँचर, लोखंडी सळ्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे ०२ नग लेथ मशीन, ०२ नग मोटर, ग्रींडर मशीन, इन्व्हर्टर व बॅटरी, वायर बंडल, सोलर प्लेट, इ. मोठ¬ा प्रमाणात शस्त्र व शस्त्रनिर्मिती साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले शस्त्रनिर्मितीचे माओवादी साहित्य पथकातील जवानांकडून जागीच नष्ट करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली . एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, पोलीस उप-अधीक्षक नारायणपूर मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक प्राणहिता, बीडीडीएस प्राणहिता व डीआरजी नारायणपूर पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून, पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




