महत्वाच्या बातम्या

 मित्रासोबत फिरायला जाण्यास नकार दिल्याचा राग : नागेपल्लीत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : मित्रासोबत बाहेर फिरायला जाण्यास वडिलांनी नकार दिल्याच्या रागातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरी सिलिंग फॅनला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे घडली. ऐनोस राजेश टोप्पो १४ वर्षे रा. नागेपल्ली, ता. अहेरी असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऐनोस याने वडील राजेश एमिल टोप्पो ४९ वर्षे यांच्याकडे मित्रासोबत फिरायला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, वडिलांनी त्यास नकार दिला. रविवारी २२ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेच्या सुमारास ऐनोसचे आई-वडील प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते, तर ऐनोस घरीच थांबला होता. घरी कोणीही नसल्याची संधी साधत त्याने रागाच्या भरात सिलिंग फॅनला गळफास घेतला.

प्रार्थना आटोपून घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार वडिलांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ आतून बंद असलेला दरवाजा कसाबसा उघडून पत्नीला बोलावले. त्यानंतर दोघांनीही ऐनोसला दुचाकीवरून तातडीने नागेपल्ली येथील ओ.सी.सी. सेवा सदन रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी त्याला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती ऐनोसला मृत घोषित केले.

याप्रकरणी वडील राजेश टोप्पो यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून अहेरी पोलीस ठाण्यात कलम १९४ बी.एन.एस.एस. २०२३ अन्वये आकस्मिक मृत्यूची (मर्ग क्र. ५१/२०२६) नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राणी कराड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





  Print






Related Photos