मधकेंद्र योजना व मधाचे गाव योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित : मधुमक्षिकापालन व्यवसायाद्वारे उत्पन्न वाढीची संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना व मधाचे गाव ही योजना राबविली जात आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२६-२७ करिता जिल्ह्यातील शेतकरी, फळबागाईतदार, फुलशेती करणारे शेतकरी बांधव तसेच इच्छुक लाभार्थी यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरून घेण्यास सुरुवात झालेली आहे.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ मार्फत ५०% शासकीय अनुदानाचा लाभ (साहित्य स्वरुपात ५०% अनुदान व ५०% स्वगुंतवणूक तत्वावर साहित्य स्वरुपात उपलब्ध करून दिले जाते) तसेच शासनाचे हमी भावाने मध खरेदी विशेष व छंद प्रशिक्षणाची सुविधा, माधामाशींचे संरक्षण वा संवर्धन बाबत जनजागृती तसेच मध व्यवसाय संदर्भात विविध प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते.
वैयक्तिक मधपाळ घटकासाठी अर्जदार साक्षर असणे आवश्यक असुन स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे. केंद्रचालक (प्रगतीशील मधपाळ) घटकासाठी संबंधित व्यक्ती किमान १० वी उत्तीर्ण असावी तसेच वय २१ वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्तीचे किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांचे नावावर किमान १ एकर शेत जमीन अथवा भाडे तत्वावर घेतलेली असावी, तसेच लाभार्थ्याकडे मधमाशी पालन, प्रजनन व मध उत्पादन बाबत इतरांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आणि आवश्यक सुविधा असणे बंधनकारक आहे.
केंद्रचालक संस्था घटकासाठी संबधित संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावावर किंवा भाडेतत्वावर किमान एक हजार चौरस फुट क्षेत्रफळाची सुयोग्य इमारत उपलब्ध असावी. तसेच मधमाशी पालन, प्रजनन आणि मध उत्पादन विषयक प्रशिक्षण देण्याची क्षमता संस्थेकडे असणे आवशक आहे. लाभार्थी निवड प्रकीयेनंतर प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्याबाबत बंधपत्र देणे मंडळास अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणेही लाभार्थीसाठी बंधनकारक राहील.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकरी अथवा मधपालन उद्योगात आवड असलेल्या लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ भंडारा, पोस्ट ऑफिस चौक जांभुळकर निवास, बाबा मस्तानशहा वार्ड, जिल्हा कार्यालय भंडारा, येथे भेट देऊन आपले नाव सदर योजनेमध्ये नोंद करावे.
इच्छुक शेतक-यांना आपल्या शेतामध्ये परागीभवन किंवा शेतीपुरक व्यवसाय करावयाचा असेल त्यांनी त्वरित आपले अर्ज भरून घ्यावेत. भंडारा जिल्यातील जास्तीत जास्त शेतकरी, युवक-युवती तसेच संस्थांनी या योजनेचा लाभ घेवून मधुमक्षिकापालन व्यवसायाद्वारे उत्त्पन्न वाढीची संधी साधावी, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. देवीपुत्र यांनी केले आहे.
इच्छुकांनी आपले नामांकन २५ जुलै २०२६ पूर्वी मंडळाचे जिल्हा कार्यालयात पाठवावे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, भंडारा येथील मधुक्षेत्रिक रोहित रत्नपारखी मो. ७०८३९०६१०१ यांचेशी संपर्क साधावे.
News - Bhandara




Petrol Price




