कोळशाचा अजस्र ढिगारा खचल्याने ट्रक चालकाचा मृत्यू : एकोणा खाणीत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

- भरपाईशिवाय मृतदेह उचलण्यास कामगारांचा नकार नातेवाईक आल्यानंतर निर्णायक बैठक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वेकोलीच्या एकोणा कोळसा खाणीत गुरुवारी १६ पहाटे साडेचारच्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेत कोळशाचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खाण परिसरात एकच खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संतप्त कामगार संघटनांनी मृताच्या कुटुंबाला भरीव नुकसानभरपाई जाहीर होईपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन व अंत्यसंस्कार होऊ देणार नसल्याची भूमिका घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत चालकाचे नाव पुष्पेंद्र सिंग ४५ वर्ष रा. मध्य प्रदेश असे असून, तो चड्ढा कंपनीच्या ट्रकवर चालक म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी १७ त्याचे नातेवाईक मध्य प्रदेशातून वरोरा येथे पोहोचणार असून, त्यानंतर वेकोली प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधित पक्षांमध्ये भरपाईबाबत बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोळसा भरताना घडली दुर्घटना -
एकोणा येथील खाण क्रमांक १ मध्ये गुरुवारी पहाटे कोळशाच्या गाड्या भरण्याचे काम सुरू होते. एमएच-३४ बीजे-०९१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये कोळसा भरला जात असताना चालक पुष्पेंद्र सिंग ट्रकच्या बाजूला उभा होता. त्याचवेळी बाजूला साठवून ठेवलेला कोळशाचा अजस्र ढिगारा अचानक खचला आणि त्याखाली तो दबला गेला.
घटनास्थळी उपस्थित कामगारांनी तत्काळ ढिगारा हटवून त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न -
या अपघातानंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खाणीत कंत्राटी कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने, मूलभूत सुविधा आणि सुरक्षित कार्यपद्धती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. अशा धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत असल्याने ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचा आरोपही करण्यात आला.
संतप्त कामगारांचा ठिय्या -
घटनेची माहिती मिळताच विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले. मृताच्या कुटुंबाला योग्य व भरीव नुकसानभरपाई जाहीर होईपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन अथवा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी आमदार करण देवतळे यांनीही घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन कामगारांशी तसेच वेकोली अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आज नातेवाईकांच्या उपस्थितीत बैठक -
मृत चालकाचे नातेवाईक मध्य प्रदेशातून वरोरा येथे आल्यानंतर वेकोली प्रशासन, जीएमआर, कंत्राटदार कंपनी आणि ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसानभरपाई व इतर मागण्यांवर निर्णय झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्या -
- मृत चालकाच्या कुटुंबाला वेकोली व कंत्राटदार कंपनीकडून तातडीने भरीव नुकसानभरपाई द्यावी.
- सर्व कंत्राटी कामगार व चालकांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि विमा संरक्षण लागू करावे.
- खाण परिसरात २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका उपलब्ध ठेवावी.
- सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी.
- खाणीत आधुनिक सुरक्षा उपाययोजना तातडीने लागू करून अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती रोखावी.
News - Chandrapur




Petrol Price




