दुर्गम भागातील आरोग्यसेवेला मिळणार नवे बळ : गर्देवाडा येथे स्नेहधर्म डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम अशा गर्देवाडा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेची एक नवी पहाट उजाडली आहे. स्नेहादेवी राजे धर्मरावबाबा आत्राम बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या स्नेहधर्म डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन राज्याचे मंत्री तथा स्थानिक आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते थाटात पार पडले.
आरोग्यसेवा दारी, आता दूरवर जाण्याची गरज नाही -
दुर्गम व आदिवासी भागातील रुग्णांना छोट्या-मोठ्या वैद्यकीय तपासण्या आणि निदानासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून शहरात जावे लागत असे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय व्हायचा. ही समस्या ओळखून या केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. आधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेल्या या केंद्रात स्थानिक स्तरावरच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध होणार असल्याने परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार -
यावेळी बोलताना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ग्रामीण व अतिदुर्गम भागातील जनतेला सुलभ, दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या केंद्राच्या माध्यमातून दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेला खऱ्या अर्थाने नवी दिशा मिळाली आहे.
युवा नेतृत्वाचा पुढाकार -
या महत्त्वपूर्ण आणि जनकल्याणकारी उपक्रमासाठी युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम आणि डॉ. मिताली आत्राम यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या कार्याचे कौतुक सर्वस्तरातून होत असून, स्नेहादेवी राजे धर्मरावबाबा आत्राम बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे हा प्रकल्प साकार होत आहे. परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




