महत्वाच्या बातम्या

 न्यू गोंडेगाव ज्वेलरी शॉप चोरीप्रकरणी तिघे ताब्यात : दोघांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : तालुक्यातील न्यू गोंडेगाव येथील ज्वेलरी शॉपमध्ये झालेल्या चोरीप्रकरणाचा उलगडा करण्यात कन्हान व खापरखेडा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

आरोपींकडून चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान चोरी व घरफोडीचे आणखी पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू गोंडेगाव येथील किशोर गुरव रा. टेकाडी, ता. पारशिवनी यांच्या मालकीच्या ज्वेलरी शॉपमध्ये १२ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान गौरव ऊर्फ तेनाली राजू राऊत २१ वर्षे रा. अशोकनगर, कन्हान आणि एका अल्पवयीन मुलाचा सहभाग निष्पन्न झाला. सोमवारी २० हे दोघे कामठी रेल्वेस्थानक परिसरातून रेल्वेने डोंगरगड छत्तीसगड येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गौरवने चोरीची कबुली देत या गुन्ह्यात साहिल किशोर लांजेवार २१ वर्षे रा. बुद्धनगर, जरीपटका, नागपूर याचाही सहभाग असल्याची माहिती दिली.

दरम्यान, अन्य एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असलेल्या खापरखेडा पोलिसांनी साहिलला नागपूर शहरातून ताब्यात घेऊन अटक केली. गौरवला अटक करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीला न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले.

दीड लाखांचा मुद्देमाल जप्त -
आरोपींकडून पोलिसांनी चांदीचे दागिने, देवघरात वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वस्तू तसेच इतर साहित्य असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पाच चोरीचे गुन्हे उघड -
चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरी व घरफोडीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये चार घरफोडी व दुकानफोडीचे गुन्हे, तर एक जबरी चोरीचा गुन्हा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. दुकानफोडी व घरफोडीचे चारही गुन्हे कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत, तर जबरी चोरीचा गुन्हा कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे.

या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या मालिकेचा उलगडा झाला असून, पोलिसांकडून या टोळीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos