महत्वाच्या बातम्या

 ट्रकची बुलेटला धडक : एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भरधाव ट्रकने बुलेट दुचाकीला धडक दिल्याने एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना १३ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गडचांदूरपासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावरील कवठाळा गावाजवळ घडली. मृत मुलाचे नाव श्रेयस गुरुदास झोडे (१७) असून वेदांत महेश ढुमणे (१७) हा गंभीर जखमी झाला आहे.

शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील चकफुटाणा येथील श्रेयस झोडे आणि त्याचा मावसभाऊ वेदांत ढुमणे हे कोरपना तालुक्यातील कोराडी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी आले होते. बुधवारी सायंकाळी दोघेही बुलेट दुचाकीने गडचांदूरकडे जात असताना कवठाळा गावाजवळील जय हिंद कॉटन जिनिंगकडे वळत असताना ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ५९७६ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर ट्रक चालक वाहन जागीच सोडून पसार झाला. संबंधित चालक हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील असल्याची माहिती समोर आली आहे. धडकेत श्रेयस आणि वेदांत हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे मामा गणेश नानाजी रोगे (४०) घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना गडचांदूर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल शेख यांनी तपासणीअंती श्रेयसला मृत घोषित केले, तर वेदांतची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

या प्रकरणी गणेश रोगे यांच्या तक्रारीवरून गडचांदूर पोलिसांनी फरार ट्रक चालकाविरुद्ध हिट अँड रनसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार ज्ञानेश्वर मडावी करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos