महत्वाच्या बातम्या

 धावत्या ट्रॅक्टरवरून उडी घेताना अपघात : ट्रॉलीच्या चाकाखाली दबून तरुणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोरंभीटोला गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. धावत्या ट्रॅक्टरवरून स्वतः उडी घेतल्यानंतर तोल जाऊन ट्रॉलीच्या चाकाखाली दबल्याने ही घटना घडली.

मृत तरुणाचे नाव अरविंद हरिराम मेश्राम वय ३८, रा. बोळदा-बाराभाऊ, जि. गडचिरोली असे आहे. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी २३ सकाळी सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास कोरंभीटोला परिसरात ट्रॅक्टर सुरू असताना अरविंद मेश्राम यांनी धावत्या ट्रॅक्टरवरून उडी घेतली. मात्र उडी घेताना त्यांचा तोल गेला आणि ते ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीजवळ पडले. यावेळी ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

अपघात इतका भीषण होता की, त्यात अरविंद मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

या प्रकरणी श्रेयस जगदीश गायकवाड वय २१, रा. बोळदा-बाराभाऊ, जि. गडचिरोली यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos