महत्वाच्या बातम्या

 हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकमधून डोडा पावडर जप्त; दोन जण अटकेत : कोरपना पोलिसांची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैधरित्या अंमली पदार्थ डोडा पावडर (पॉपी स्ट्रॉ) बाळगून हैद्राबाद कडे वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व क्लिनरविरुद्ध कोरपना पोलिसांनी मोठी कारवाई करत १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात जम्मू-काश्मीर येथील ट्रक चालक जसवंतलाल श्रीबिसन दास (वय ४०), रा. घगवाल, ता. व जि. सांबा, जम्मू-काश्मीर व क्लिनर सोनू लवकुमार शर्मा (वय ३६), रा. घगवाल, ता. व जि. सांबा, जम्मू-काश्मीर यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ मे रोजी कोरपना पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गडचांदूरकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या जेके-२१ सी-४५९९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये अवैधरित्या डोडा पावडरची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे कोरपना पोलिसांनी  गडचांदूर-कोरपना मार्गावरील वनसडी येथील शोयब सुपर मार्केटसमोर सापळा रचला.

संशयित ट्रक थांबवून ट्रकची तपासणी केली असता एका पांढऱ्या पोत्यामध्ये चार हिरव्या रंगाच्या पॉलीथीन पिशव्यांमध्ये गोल्डन-भुरकट रंगाची पावडर आढळून आली. तसेच क्लिनरच्या आसनाच्या मागील बाजूसही अशाच प्रकारची एक पॉलीथीन पिशवी सापडली. त्यात एकूण २.२६७ किलो डोडा पावडर किंमत ९ हजार ६८ रुपये तसेच १२ चाकी ट्रक किंमत १० लाख रुपये असा एकूण १० लाख ९ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात आरोपी विरुद्ध कलम ८(क), १५(ब) व २९ एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोउपनि देवानंद केकन पोहवा साईनाथ, पोहवा नामदेव,  पोहवा पंढरी नापोशि रामदास पोअं विशाल, जितेंद्र, दिपक, किशोर, चापोशि किशोर पोस्टे कोरपना यांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos