अमरावतीत हलबा जमातीचे राष्ट्रीय महाचर्चा सत्र उत्साहात


- सामाजिक, शैक्षणिक व कायदेशीर प्रश्नांवर सखोल मंथन, पुढील वाटचालीसाठी कृती आराखडा निश्चित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अमरावती : राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ, गडचिरोली यांच्या पुढाकाराने तसेच आदिवासी हलबा-हलबी उत्कर्ष मंडळ, अमरावती यांच्या सहकार्याने संत गाडगे महाराज सभागृह, अमरावती येथे उच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार कोष्टी हा व्यवसायवाचक शब्द असून, त्या अनुषंगाने हलबा जमातीची पुढील दिशा या विषयावर राष्ट्रीय महाचर्चा सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या चर्चासत्रात हलबा समाजाच्या न्यायालयीन, सामाजिक, शैक्षणिक, कायदेशीर आणि संघटनात्मक प्रश्नांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
महाचर्चेत केवळ उच्च न्यायालयाच्या निरीक्षणापुरती चर्चा मर्यादित न ठेवता, हलबा समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी भविष्यात कोणती दिशा स्वीकारावी, समाजाची संघटनात्मक ताकद कशी वाढवावी, तसेच शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि कायदेशीर लढा अधिक प्रभावीपणे कसा उभारावा, यावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. या विचारमंथनातून हलबा समाजाच्या हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देणारा आशादायी मार्ग समोर आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक शरद सोनकुसरे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. दीपक केदार, नाशिकचे ज्येष्ठ अभ्यासक नितीन नागपूरे तसेच राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय धकाते यांचा समावेश होता.
महाचर्चेत नितीन नागपूरे, डॉ. दीपक केदार, कृष्णा चांदेकर (नागपूर), श्याम सोनकुसळे (मुंबई), राजेंद्र नंदनवार (नाशिक), ॲड. प्रशांत राईकवार (अचलपूर), राकेश कुंभारे (मुंबई), प्रशांत सिलेकर (नागपूर), देवराव देवघरे (मुंबई), राजा पराते (अमरावती), सुधाकर कोसराबे (कल्याण), राजेंद्र बोकडे (भुसावळ), महादेव कुंभारे आदी मान्यवरांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. वक्त्यांनी समाजाच्या एकजुटीची आवश्यकता, कायदेशीर लढ्याचे महत्त्व, शिक्षणाचा प्रसार आणि संघटनात्मक बळकटी यावर विशेष भर दिला.
चर्चासत्रानंतर हलबा समाजाच्या भविष्यातील संघटनात्मक वाटचालीसाठी कृती आराखडा निश्चित करण्यात आला. तसेच कार्यकारिणीचा विस्तार करून विविध समित्यांवर सक्रिय कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश कुंभारे यांनी केले. विषयाची भूमिका राष्ट्रीय हलबा जमात महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आयोजक उदय धकाते यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विजय रणदिवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय धार्मिक यांनी केले.
या राष्ट्रीय महाचर्चा सत्राला राज्यातील विविध भागांतून हलबा समाजाच्या संघटनांचे पदाधिकारी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला प्रतिनिधी सुचिता धकाते, ज्योती चांदेकर, अश्विनी सहारकर, चंदा हेडाऊ, चित्रा कोहाडे, राईकवार यांच्यासह १०० हून अधिक प्रतिनिधींनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
News - Rajy




Petrol Price




