अतुल गण्यारपवार यांना झालेल्या मारहाणीचा निषेध
- दोषींवर कठोर कारवाई करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे २० एप्रिल २०२३ ला अधिकाऱ्याकडून झालेली मारहाण ही दहशत निर्माण करणारी गंभीर बाब आहे. त्यामुळे दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अतुल गण्यारपवार हे शेतकरी नेते असून ते जिल्हा परिषदेचे कृषी सभापती म्हणून काम केले आहे. नागपूर विभागातील मोजक्या बाजार समिती पैकी एक असलेल्या चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासात अतुल गण्यारपवार यांची मोलाची भूमिका आहे. मात्र निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांनी एकत्र येवून अतुल गण्यारपवार यांच्या विरोधात पॅनल उभे करणे, त्यातून तणाव निर्माण होणे आणि त्याच वेळी एका जबाबदार अधिकाऱ्याकडून जबर मारहाण होणे हे निवडणूकीमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी केलेला कट आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मारहाण प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि बाजार समितीच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना व नेत्यांना सुरक्षितता द्यावी. तसेच या मारहाणी मागे विरोधी पॅनलच्या नेत्यांची संबंधित आरोपी अधिकाऱ्याला फुस आहे का? याचीही चौकशी करावी, अशी मागणी शेकाप नेते भाई रामदास जराते यांनी केली आहे.
News - Gadchiroli