हुंदाई वर्कशॉपमध्ये विजेचा कहर : २१ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सकाळी कामावर गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाल्याने मोरवा परिसरावर शोककळा पसरली. नागपूर मार्गावरील ताडाळीजवळील केतन हुंदाई वर्कशॉपमध्ये मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. सारंग उर्फ मोहन कोयताडे २१ वर्षे रा. मोरवा, असे मृत कामगाराचे नाव आहे. सहकारी शुभम उमाटे २९ वर्षे यालाही मोहनला वाचविताना विजेचा धक्का बसला.
नेहमीप्रमाणे मोहन आणि शुभम डेंटिंग-पेंटिंगच्या कामासाठी वर्कशॉपमध्ये आले होते. परिसरात अचानक दुर्गंधी येत असल्याने नेमके कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी टिनाच्या शेडवर चढून पाहणी सुरू केली. याचवेळी वर्कशॉपलगतच्या झाडाला लागून गेलेल्या जिवंत विद्युत तारेतून संपूर्ण झाडात वीजप्रवाह उतरल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. पाहणी करत असतानाच मोहनचा झाडाला स्पर्श झाला आणि क्षणार्धात विजेचा जबर धक्का बसला.
डोळ्यांसमोर सहकारी विजेच्या विळख्यात सापडल्याचे पाहून शुभमने त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र मदतीसाठी पुढे सरसावलेल्या शुभमलाही विजेचा धक्का बसला. त्यानंतर इतर कामगारांनी धाव घेत दोघांना बाहेर काढले. गंभीर अवस्थेतील मोहनला तातडीने पडोली येथे आणि त्यानंतर चंद्रपूर येथील बालाजी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शुभमवर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
मोहनच्या मृत्यूची बातमी समजताच वर्कशॉपमधील कामगारांना मोठा धक्का बसला. काही वेळातच संतप्त कामगारांनी वर्कशॉप बंद ठेवून बालाजी रुग्णालय गाठले. तरुण मुलगा गमावलेल्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. ३० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला.
व्यवस्थापनाकडून सुरुवातीला १० लाख रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविण्यात आली. मात्र कामगार आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. परिस्थिती चिघळू नये म्हणून रामनगर पोलिसांचे पथक आणि दंगा नियंत्रण पथक रुग्णालयात दाखल झाले. व्यवस्थापन, कामगार आणि पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या.
अखेर मृताच्या कुटुंबीयांना १४ लाख रुपयांची मदत, इतर लाभ तसेच मोहनच्या वडिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. रोजीरोटीसाठी घराबाहेर पडलेल्या तरुणाचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने मोरवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




Petrol Price




