होडी पलटल्याने ११ जण बुडाले नदीत, तिघांचे मृतदेह लागले हाती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोट उलटल्याने वर्धा नदीपात्रात 11 जण बुडाल्याची माहिती आहे. तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे.
एकाच परिवरातील 11 जण दशक्रिया विधीसाठी आले होते. काल दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज फिरायला गेले असता ही दुर्घटना घडली. नाव उलटून तिघा जणांना जलसमाधी मिळाली, तर आठ जणांचा शोध सुरु आहे.
अमरावती जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप तीन मृतदेह मिळाले आहेत.
एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते.
अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-09-14


Related Photos