महत्वाच्या बातम्या

 बाप्पाच्या निरोपासाठी चंद्रपूरची लगबग : वाहतुकीचे मार्ग बदलून शहर सज्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी चंद्रपूर शहर सज्ज झाले असून, २५ सप्टेंबर रोजी निघणाऱ्या भव्य विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक नियमन लागू केले आहे.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या आदेशानुसार प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक, गांधी चौक, रामनगर रोड, संत केवलराम चौक ते ईरई नदी रामसेतू पूल हा मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग मिरवणूक पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मूलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने वरोरा नाका उड्डाणपूल, सावरकर चौक, बंगाली कॅम्पमार्गे मूल किंवा बल्लारशाकडे जातील. मूल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी वाहनेही बंगाली कॅम्प, सावरकर चौक, वरोरा नाका नवीन उड्डाणपूल मार्गे नागपूरकडे वळविण्यात येणार आहेत.

नागपूरकडून शहरात येणाऱ्या जड वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना छोटा नागपूर मार्गे दाताळा चौक, देवाळा गाव, चोराळा टी-पॉईंटमार्गे विनया गेट किंवा पठाणपुरा गेटमधून शहरात प्रवेश करता येणार आहे. शहरातील नागरिकांनी नागपूर, वणी, घुग्घुस आणि गडचांदूरकडे जाण्यासाठी विनया गेट, घोराळा, दाताळा आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बल्लारशा व मूलकडून शहरात येणाऱ्या जड वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना बसस्टँड, एलआयसी कार्यालय, यगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरात प्रवेश करता येणार आहे. प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबूपेठमार्गे अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेशाची मुभा राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या काळात जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक, जटपुरा गेट ते रामनगर रोडमार्गे रामसेतू पूल, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते मिलन चौक ते जोडदेऊळ, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्निक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज तसेच छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर या मार्गांवर ‘नो पार्किंग’ आणि ‘नो हॉकर्स झोन’ लागू करण्यात आला आहे.

या मार्गांवर नागरिक, व्यावसायिक आणि गणेश मंडळांनी वाहने उभी करू नयेत, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुख्य मिरवणूक मार्गावरील रहिवाशांना पार्किंगसाठी जुबली हायस्कूलचे पटांगण तसेच महानगरपालिकेजवळील पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, मिरवणूक संपल्यानंतरच तेथून वाहने काढता येणार आहेत. विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल नगीना बाग, सिंधी पंचायत भवन संत केवलराम चौकाजवळ रामनगर, व्यायामशाळा ग्राउंड पठाणपुरा चौक, डी.एड. कॉलेज ग्राउंड बाबूपेठ आणि महाकाली मंदिर ग्राउंड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही पार्किंग व्यवस्था २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी आपली वाहने निर्धारित पार्किंगस्थळीच उभी करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश मंडळांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या मिरवणूक मार्गाचे पालन करावे तसेच नागरिकांनी वाहतूक अधिसूचनेतील नियमांचे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. गणरायाला निरोप देताना शांतता, सुव्यवस्था आणि वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी गणेश मंडळे व नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीनुसार वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





  Print






Related Photos