महत्वाच्या बातम्या

 गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या कल्पना कोकास : निःस्वार्थ सेवाकार्याला पुस्तकातून शब्दरूप


- प्रेमाचे दोन घास पुस्तकाचे प्रकाशन

- हंसराज अहीर यांचे गौरवोद्गार; समाजासाठी प्रेरणादायी सेवाकार्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : निराधार, दिव्यांग आणि गरजू व्यक्तींना स्वतःच्या हाताने तयार केलेले त्यांच्या आवडीचे भोजन प्रेमाने वाढून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या समाजसेविका देवकी ऊर्फ कल्पना कोकास यांचे सेवाकार्य अनुकरणीय आहे. कोणतीही प्रसिद्धी किंवा अपेक्षा न ठेवता त्या करीत असलेले कार्य समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, डॉ. नरेंद्र कोलते आणि पुणे येथील सेवामित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते यांनी काढले. कल्पना कोकास लिखित ‘प्रेमाचे दोन घास’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. मित्र परिवाराच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉनमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तकात गरजू व्यक्तींना भोजन देताना आलेले हृदयस्पर्शी अनुभव कल्पना कोकास यांनी शब्दबद्ध केले आहेत.


सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नरेंद्र कोलते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला हंसराज अहीर, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन मेश्राम, अ‍ॅड. वासुदेव खेळकर, प्रसिद्ध व्यावसायिक रामनिवास सोमाणी, पुणे येथील समाजसेवक शिरीष मोहिते, लक्ष्मी नृसिंह सूंचूवार, सविता प्रभाकर विघ्नेश्वर आणि लेखिका कल्पना कोकास यांची प्रमुख उपस्थिती होती. हंसराज अहीर म्हणाले की, कल्पनाताई एवढे मोठे मानवतावादी कार्य करीत आहेत, याची त्यांना यापूर्वी माहिती नव्हती. त्यांच्या सेवाकार्याची माहिती होणे हे आपले सौभाग्य आहे. समाजात अनेकजण कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीकडून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी.


अध्यक्षीय भाषणात डॉ. नरेंद्र कोलते यांनी कल्पनाताईंनी आपल्या सेवाभावातून परिचारिकेच्या सेवाव्रताचा खऱ्या अर्थाने प्रत्यय घडवून आणल्याचे सांगितले. शिरीष मोहिते यांनी या पुस्तकातून समाजात सेवाभाव आणि मानवतेची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन नागपूर येथील किशोर गलांडे यांनी केले. सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos