नागपुरातून दत्तक प्रक्रियेला नवी दिशा : सात बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब


- फ्रान्ससह मुंबई, पुणे व वर्धा येथील दत्तक इच्छुक पालकांना कायदेशीर दत्तक आदेश; CARA मार्गदर्शक प्रणालीद्वारे ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या दत्तक प्रक्रियेला नागपुरात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. केंद्रीय दत्तक प्राधिकरण (CARA), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक प्रणालीद्वारे सात बालकांच्या दत्तक आदेशाची ऑनलाइन प्रक्रिया ३ सप्टेंबर २०२६ रोजी पूर्ण करण्यात आली.
नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया शासनाच्या निर्धारित नियमांनुसार पार पडली. या प्रक्रियेद्वारे फ्रान्स येथील १, मुंबई येथील ३, पुणे येथील २ आणि वर्धा येथील १ अशा एकूण सात बालकांना दत्तक इच्छुक पालकांचे कायदेशीर कुटुंब मिळाले.
महाराष्ट्रात CARA च्या मार्गदर्शक प्रणालीचे ऑनलाइन अपडेट करण्याची प्रक्रिया नागपूर येथून करण्यात आल्याने दत्तक प्रक्रियेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे दत्तक प्रक्रियेत पारदर्शकता, कायदेशीरता, सुलभता आणि कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होत आहे.
या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, कायदा व परिविक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने, तसेच श्रद्धानंद दत्तक संस्थेच्या ललिता गावंडे व प्रतिमा दिवाणजी यांच्यासह दत्तक इच्छुक पालक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाच्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सात बालकांना कायदेशीररित्या कुटुंबाचा आधार मिळाल्याने त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षित, प्रेमळ आणि कौटुंबिक वातावरण उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
बालकांच्या पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल -
बालकांना संस्थात्मक संगोपनाऐवजी शक्य तितक्या सुरक्षित आणि कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा दत्तक प्रक्रियेचा प्रमुख उद्देश आहे. दत्तक प्रक्रियेमुळे बालकांना केवळ कुटुंब मिळत नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, भावनिक सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आधार मिळतो.
नागपुरातून पार पडलेली ही ऑनलाइन दत्तक प्रक्रिया बाल संरक्षण व पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वाचे सकारात्मक पाऊल ठरली असून, सात बालकांना हक्काचे कुटुंब मिळाल्याने त्यांच्या जीवनाला नव्या आशेची आणि सुरक्षित भविष्याची दिशा मिळाली आहे.




Petrol Price




